पंचगंगा नदीत पारंपरिक पध्दतीने घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन

- कोल्हापुरात पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी बॅरिकेड हटविले - गणेशभक्त-पोलिस प्रशासनामध्ये वादावादी - शहरासह उपनगरातील इतर ठिकाणी पर्यावरणपूरक विहीर, खणसह ज्या त्या परिसरातील जलकुंडात गणेश मूर्तींचे विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने पंचगंगा नदीपात्रात उभारलेल्या बॅरिकेडचा काही भाग हटवून शनिवारी काही गणेश भक्त, कार्यकर्त्यांनी नदीमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याची घटना घडली. यामुळे विसर्जनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, काही संघटनांचे पदाधिकारी आणि प्रशासनामध्ये जोरदार वादावादी झाली. प्रशासनाकडून गणेशभक्तांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही गणेशभक्तांनी पंचगंगा नदीतच विसर्जन केले. यानंतर जलकुंडाएेवजी नदीमध्ये पारंपरिक पध्दतीने घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याला नागरिकांनी पसंती दिली.


गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मूर्ती दान उपक्रमाला ब्रेक
कोल्हापूर महापालिकेकडून होणाऱ्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदी मार्गावर बॅरिकेट्स लावले होते. यासाठी गेल्या काही वर्षांपासून जलकुंडामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करुन मूर्ती दान उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाला यंदाच्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावेळी ब्रेक लागल्याची परिस्थिती पंचगंगा नदीवर पहायला मिळाली गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार नागरिकांनी विसर्जनस्थळी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीपासून काही अंतरावर कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते. मात्र, शहरातील गटारे, कारखान्यांचे सांडपाणी नदीत मिसळते तेव्हा पंचगंगेचे प्रदूषण होत नाही का, गणेशमूर्ती विसर्जन करतानाच नदी कशी प्रदूषित होते, असा सवाल करत गणेशभक्तांनी शनिवारी प्रशासनाने लावलेल्या बॅरिकेट्स तोडून घरगुती गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीत विसर्जन केले.


पोलिसांबरोबर वादावादीचा प्रसंग
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने नदीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावले होते. परंतु नदीतच विसर्जन करणार या जिद्दीने कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि पोलिसांचे विरोध झुगारून बॅरिकेटिंग तोडले. या प्रकारानंतर घाटावर पोलिसांबरोबर वादावादी झाली आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.
पदाधिकाऱ्यांनी उचलले पाऊल
पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिकेकडून बॅरिकेट्स लावून रस्ता अडवला होता. या ठिकाणी मोठा पोलिस फौज फाटा तैनात केला होता. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही येथे कार्यरत होते. पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले तर नदी प्रदूषित होईल, असे सांगत हे अधिकारी गणेशभक्तांना गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित करू नका, असे सांगत होते. मात्र, सकाळी ११ वाजताच काही संघटनेचे पदाधिकारी आल्यानंतर त्यांनी थेट बॅरिकेट्स हटविले आणि मूर्ती नदीत विसर्जित केल्या.
फेरविसर्जनाच्या मूर्तीही केल्या विसर्जित
गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ कृत्रिम कुंडात फेरविसर्जनासाठी भाविकांनी दिलेल्या काही मूर्ती ताब्यात घेत कर्मचाऱ्यांचा विरोध झुगारुन कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत १२ वाजून ४५ मिनिटांनी मूर्तींचे विसर्जन केले. त्यानंतर इतर भाविकांनीही पंचगंगेत मूर्ती विसर्जित केल्या.

– शहरासह उपनगरातील इतर ठिकाणी पर्यावरणपूरक विहीर, खणसह ज्या त्या परिसरातील जलकुंडात गणेश मूर्तींचे विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 67
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!