गणरायाची आयुधे केवळ युध्दासाठी नसून प्रतिकात्मक साधने

- घरगुतीसह सार्वजनिक गणरायाच्या आयुधांची बाजारात लगबग - सिट मेटल, ॲक्रॅलिक व फायबरमध्ये आयुधे विक्रीसाठी सज्ज - श्रीगणेशाच्या मुख्य आयुधे आणि त्यांचे महत्त्व

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

गणपतीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये मूर्ती आणि श्री गणेशाच्या हातातील विविध आयुधे पाहायला मिळतात. ही आयुधे केवळ युद्धासाठी नसून ती मानवी जीवनाला योग्य दिशा देणारी असतात. तसेच आध्यात्मिक प्रगती साधणारी प्रतिकात्मक साधने आहेत. घरगुतीसह सार्वजनिक गणरायाच्या आयुधांची बाजारात लगबग आहे. ही आयुधे सिट मेटल, ॲक्रॅलिक व फायबरमध्ये तयार करण्यात आली असून विक्री करण्यासाठी सज्ज आहेत.


शिट मेटल, ॲक्रॅलिक व फायबरमध्ये आयुधे विक्रीसाठी सज्ज
पापाची तिकटी येथे शिट मेटलमध्ये गणरायाची आकर्षक आयुधे तयार करण्याची परंपरा कायम राखली आहे. या ठिकाणी गणेशाेत्सव काळात विविध आयुधे तयार करुन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या आयुधांमध्ये कानातील बाली, लटकन, गणपती तुरा, त्रिशुल, परसू, कमळ, सुदर्शन चक्र, धनुष्यबाण, ढाल तलवार, मागणीप्रमाणे अधुनिक पध्दतीची आयुधे आदींचा समावेश आहे. ही तयार करण्यात आलेली आयुधे ५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी सज्ज असल्याची माहिती आयुधे तयार करणारे कारागिर मधुकर माजगांवकर यांनी दिली आहे.


श्रीगणेशाच्या मुख्य आयुधे आणि त्यांचे महत्त्व
देवांची ही आयुधे आपल्याला शिकवतात की, बाह्य शत्रूंपेक्षा आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर यावर विजय मिळवणे हाच मानवी जीवनाचा खरा उद्देश आहे. दोरी – दोरी हे आयुध डाव्या हातात असते हे आयुध मानवी वासना, मोहांना नियंत्रणात ठेवण्याचे प्रतीक आहे. तसेच वाईट शक्तींना, अडथळ्यांना बांधून ठेवते. अंकुश (तीक्ष्ण हत्यार) – अंकुश हे आयुध उजव्या हातात असते. मनावर नियंत्रण ठेवण्यासह शिस्तीचे प्रतीक आहे. मानवाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. परशू (कुर्‍हाड) – परशू हे अज्ञान, बंधने तोडण्याचे प्रतीक आहे. भूतकाळातील वाईट कर्मांचा पाश कापण्यासाठी याचा वापर होतो. हे जगातील आसक्ती नष्ट करण्याचा संदेश देते. त्रिशूळ – काही मूर्तींमध्ये गणेशजींच्या हातात त्रिशूळ दिसते. हे सत्व, रज व तम या तीन गुणांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहे. हे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांवर अधिपत्य दर्शवते.
कमळ – कमळ हे सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय, शुद्धतेचे प्रतीक आहे. चिखलात उगवूनही स्वच्छ राहणाऱ्या कमळाप्रमाणे मानवाने संसारात राहूनही निष्काम असावे, हे दर्शवते. मोदक / लाडू – मोदक / लाडू हे ज्ञान, साधनेच्या गोड फळाचे प्रतीक आहे. कष्टाचे फळ नेहमी मधुर असते, असा संदेश यातून मिळतो. हे आत्मिक आनंदाचे निदर्शक आहे. वरद मुद्रा / अभय मुद्राहातात – कोणतेही शस्त्र नसताना दाखवलेली ही देवाच्या हाताची स्थिती आहे. ही मुद्रा भक्तांना संरक्षण, आशीर्वाद, निर्भयतेचे वचन देते. थोडक्यात गणरायाची आयुधे आपल्याला मन अटकावात ठेवणे (पाश), बुद्धीला योग्य दिशा देणे (अंकुश), वाईट विचारांचा नाश करणे (परशू) तर जीवनात समाधानी राहणे (मोदक) शिकवतात.
————————

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!