कॅबिनेटमध्ये खुल्या तेल विक्रीसाठी चर्चा घडवून आणणार

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन. - नष्टे लॉन येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे आयोजीत तेली समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा उत्साहात. - राज्यस्तरीय महामेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विधानसभा गटनेते आमदार विजयजी वडेट्टीवार राजकीय जुगलबंदी

कोल्हापूर :  (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

            महाराष्ट्रातील तेली समाज हा राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारा समाज आहे. संत जगनाडे महाराज, संत संताजी यांसारख्या महान संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजाने पारंपरिक व्यवसायाबरोबरच शिक्षण, उद्योग, शेती, व्यापार, प्रशासन आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, आजही समाजासमोर शिक्षण, रोजगार, व्यवसाय, सामाजिक सुविधा, जमिनी, वसतिगृहे, समाजभवन तसेच पारंपरिक तेल व्यवसायासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न आहेत. यासाठी कॅबिनेटमध्ये खुल्या तेल विक्रीसाठी चर्चा घडवून आणणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.


नष्टे लॉन येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे रविवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री तथा विधानसभा गटनेते आमदार विजयजी वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय तेली समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तथा माजी खासदार रामदासजी तडस होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते.


मंत्री बावनकुळे म्हणाले, संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र महामंडळाचा दर्जा मंगळवेढा, सोलापूर येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे तेली समाज भवनासाठी पाच एकर जागा, प्रत्येक जिल्ह्यात तेली समाज भवन व विद्यार्थी वसतिगृह उभारण्यासह प्रमुख १२ मागण्या तत्काळ सोडविण्यावर भर देणार आहे.
यानंतर बोलताना विधानसभा गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आमचे सरकार असताना तेली समाजबांधवांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. तसेच समाजाच्या विविध कामांसाठी सुमारे ७० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. आता तुमची सत्ता असून समाजाच्या समस्या, प्रश्न सोडविण्याची जबाबदारी तुमची आहे समाजाचा घटक म्हणून व विरोधक म्हणून आम्ही समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी आग्रही राहूच मात्र, मंत्री बावनकुळेंनी सरकारच्या बाजूने समाजाच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी कोपरखळीही यावेळी त्यांनी मारली.
यानंतर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महासचिव भूषण कर्डिले व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कार्याध्यक्ष गजानन शेलार यांनी समाजाच्या समस्या, प्रलंबित प्रश्न आदींवर लक्ष वेधून बावनकुळे व वडेट्टीवार यांच्या समाजिक कार्याचा आढावा घेतला. सत्ताधारी व विरोधक समाजाचा नेता असल्याने समाजाचे कार्य एकत्रित करण्यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागणार आहेत. तसेच सर्व समस्या, प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले . प्रास्ताविक व स्वागत प्रदेश उपाध्यक्ष संजय विभुते तर आभार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे युवा उपाध्यक्ष निलेश संकपाळ यांनी मानले.
चौकटी –
– अशा आहेत महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध प्रलंबित प्रमुख १२ मागण्या
१. संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र महामंडळाचा दर्जा द्यावा., २. मंगळवेढा, सोलापूर येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे., ३. मुंबई येथे तेली समाज भवनासाठी पाच एकर जागा मंजूर करावी.
४. पारंपरिक तेल व्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक व्यावसायिकांना संरक्षण द्यावे.
तसेच महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना संरक्षण, ही शासनाची दुहेरी भूमिका असावी., ५. देवस्थानच्या जमिनींबाबत तेली समाजाच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण करावे., ६. प्रत्येक जिल्ह्यात तेली समाज भवन व विद्यार्थी वसतिगृह उभारावे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेली समाजासाठी समाज भवन उपलब्ध करून द्यावे., ७. लिंगायत तेली समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न तातडीने सोडवावा., ८. तेली समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा द्याव्यात., समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, कृषी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष शिष्यवृत्ती व मार्गदर्शन योजना सुरू करावी., ९. युवक-युवतींसाठी कौशल्य व रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत., १०. महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आर्थिक योजना राबवावी., ११. तेली समाजाची सामाजिक व आर्थिक स्थितीचा स्वतंत्र सर्वेक्षण करावा., १२. पारंपरिक तेल उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष योजना राबवावी. आदी मागण्यांचा समावेश आहे.
– कोल्हापूर शहर तेली समाजातर्फे विशेष सत्कार
यावेळी बाळासाहेब साव्यानवार, गजानन सावर्डेकर, भूपाल रंगमहाले, श्रीकांत बनसोडे, सदाशिव माळकर, शिवाजी माळकर, किरण सांगावकर, सुरेश मांजरेकर तसेच पूनम सांगावकर, विद्या बनसोड, करुणा माळकर, नंदा निर्वाणी, गीता कागले, अंजली वडगावकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.


– मान्यवरांचा सत्कार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रामदास तडस, कार्याध्यक्ष गजूनाना शेलार, महासचिव प्रा. डॉ. श्री. भूषण कर्डिले , वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे, सहसचिव सुनील चौधरी, माजी आमदार शिवाजीराव चोथे, राज्य व्यापारी व उद्योग आघाडीचे अध्यक्ष पोपटराव गवळी, जयेश बागडे आदी मान्यवरांचा सत्कार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे पदाधिकारी, शहर समिती पदाधिकारी, समस्त तेली बांधवांच्या हस्ते करण्यात आला.

महामेळाव्याला उपस्थित समाजबांधव
यावेळी उदय करपे, सत्यजित सांगावकर, विश्वनाथ माळकर, सुरेश मांजरेकर, सुनील सावर्डेकर, विजय हिंगे, महादेव तेली, संजय विभुते, निलेश संपाळ, संदीप मुंडेकर, राजेंद्र लोखंडे, हर्षल फल्ले, जीवन लोखंडे, बाळासाहेब इंगळे, शिवलिंग दळवी, कैलास देशमाने, विलास उपाशे, शिवमूर्ती झगडे, अनिल साधुले, नंदकुमार तेली, मयूर सांगावकर, संजय माळकर, प्रभाकर सांगावकर, सुनील फल्ले, दत्ता फल्ले, गजानन फल्ले, अनिल विभुते, सरपंच विनय पेटकर, शिवदास कागले, शिवप्रसाद वडगावकर, राजेंद्र सोळके आदींसह महिला आघाडीच्या अर्चना कागले, महानंदा कागले, प्रियंका सांगावकर, संध्या तेली, सुवर्णा झगडे, वंदना बंबलवाड आदींसह राज्यभरातून आलेला समाजबांधव, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
———————————

तौलिक समाज मेळाव्यात मुख्यमंत्री पदावरुन कोपरखळ्या

– राज्यस्तरीय महामेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विधानसभा गटनेते आमदार विजयजी वडेट्टीवार राजकीय जुगलबंदी

            नष्टे लॉन येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे रविवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री तथा विधानसभा गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय तेली समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा घेण्यात आला. यावेळी दोन्ही नेत्यांच्यात राजकीय जुगलबंदी पहायला मिळाली यामुळे महामेळाव्यात काहीकाळ उपस्थित समाज बांघवांमध्ये हश्या पिकला.


विधानसभा गटनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारमध्ये तुम्ही दोन नंबरचे मंत्री आहात कामे करण्याचा वेग अधिक असून धडाकेबाज निर्णयांमुळे लाखो शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. मात्र, वेगात अडथळे निर्माण करणारे, नियंत्रण मिळवणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. जमीनदार, वतनदार नसून कष्टाने मिळविलेल्या मेहनतीने इथेपर्यंतचा प्रवास केला आहे. विरोधक म्हणून मी समाजाच्या समस्या, प्रलंबित प्रश्न मांडतो सत्ताधारी म्हणून तुम्ही होय म्हणा. तसेच जमलंतर २०२९ ला आमच्या पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळेल. समाज आपल्याकडे आशेने बघतोय. यासाठी समाजातील माणसाला मोठं केलं पाहिजे. ही पहिली जबाबदारी आहे., अशी कोपरखळीही आमदार वडेट्टीवार यांनी मारली.


यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संस्कारक्षम, शिक्षणसाठी तसेच सक्षम पिढी घडविण्यासाठी महिलांनी पुढकार घ्यावा. विधानसभा गटनेते आमदार विजय वडेट्टीवार विरोधाची बाजू खंबीरपणे मांडत आहेत. मेळाव्याला समाजाचा छोटा कार्यकर्ता म्हणून आलो आहे. विरोधी पक्षाचा आवाज तुम्ही असून जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी हा आवाज मोठाच असायला हवा. तर आम्ही सत्ताधारी म्हणून ते प्रश्न सोडविण्यासाठी नम्रतेने स्वीकारावे लागते. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी काम करावे लागते. सत्तेत येण्यासाठी वडेट्टीवार यांना २०४७ ची वाट पहावी लागणार आहे. यासाठी जास्तकाळ तुम्ही विरोधात राहू नका आपले विचार जुळतात २०२९ पर्यंत तुम्ही आमच्यात यायला वेळ असून आल्यास स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर विश्वास आहे. तसा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा विश्वास वडेट्टीवार यांच्यावर आहे., अशी कोपरखळी यावेळी त्यांनी मारली.

Our Visitor

5 4 8 5 4 2
Views Last 30 days : 73
Total views : 548914

You may also like

error: Content is protected !!