कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
शिक्षण, समाजसेवा आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ या माध्यमातून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांचा विचार आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी सर्वपक्ष, संघटनांच्या उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. यावेळी सर्व मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये, राजकारणाच्या पलीकडे जाऊन शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांच्या आयुष्याला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या निधनानंतर कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू महाराज, जालनाचे खासदार कल्याणराव काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी अमर रहे… अमर रहे… डी. वाय. दादा अमर रहे… अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दादांच्या साध्या, रांगड्या आणि अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी जाग्या केल्या. अनेक कुटुंबं उभी करण्यामागे त्यांची दानत मोठी होती, असे सांगत त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांनी डॉक्टर आणि इंजिनिअर व्हावे, यासाठी दादांनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवली. छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीने वागणाऱ्या दादांची आठवणही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितली. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांनी राजकारणातून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा दिली. शिक्षण हेच परिवर्तनाचं माध्यम मानून त्यांनी उभारलेली ही ज्ञानाची चळवळ पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
महापौर रुपाराणी निकम यांनी दादांचे जाणे म्हणजे ज्ञानपर्वाचा अंत नसून नव्या ज्ञानयुगाचा उगम आहे, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच कोल्हापूर शहरात डॉ. डी. वाय. पाटील यांचं भव्य स्मारक उभारण्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांनी दादांच्या सेवाभावी वृत्तीची आठवण सांगताना संत तुकारामांच्या अभंगातील ओळींचा दाखला दिला. स्वतः आमदार झाल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून आपल्याला सांभाळून घेण्याची विनंती केली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली. माजी आमदार संपतराव पवार पाटील सडोलीकर यांनी बहुजन समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेलं असून, आता समाज आणि कुटुंबीयांनी एकत्र येऊन त्यांचं कार्य पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचं सांगितले. माजी आमदार जयश्री जाधव यांनी शिक्षणाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत लोकसेवा, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे कोल्हापूरची ओळख राज्यभर निर्माण झाली, अशा भावना व्यक्त केल्या.
माजी आमदार राजुबाबा आवळे यांनी डी. वाय. पाटील समूहाने शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे काम केले. विशेषतः गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी केले, अशी आठवण सांगितली. माजी आमदार राजीव आवळे यांनी दादांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू म्हणजे सामान्य कार्यकर्त्याशी असलेली त्यांची आपुलकी. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचीही ते आवर्जून चौकशी करायचे, अशी आठवण सांगितली. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मराठी माणसाला मोठी भरारी घेऊन दिली, अशा भावना व्यक्त केल्या.
शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांची ज्ञानगंगा पुढेही प्रवाहित राहावी, तसेच त्यांच्या स्मृतिदिनी वैचारिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात यावी, अशी सूचना केली.


दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनीही दादांच्या आठवणी जागवत सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी कुष्ठरोगी बांधवांच्या सेवेसाठीही डॉ. डी. वाय. पाटील सदैव पुढे राहिले. कुष्ठरोगी मुलांची शैक्षणिक फी त्यांनी कधीही घेतली नाही, अशी आठवण सांगितली. कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी आठ ते दहा एकर जागेत संग्रहालयासारखं ज्ञानपीठ उभारण्याची भावना व्यक्त केली. बालपणापासूनचे मित्र बापूसाहेब मर्दाने यांनी दादांनी शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे केल्याचं सांगत, ते कसबा बावड्याचं हृदय होते, अशी भावना व्यक्त केली. अशोक भंडारी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण सांगितली. तर अंबपचे विजयसिंह माने यांनी एवढे मोठे व्यक्तिमत्त्व असूनही समाजाशी आणि सामान्य माणसाशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती, अशी आठवण सांगितली.
यावेळी कॉम्रेड दिलीप पोवार, वसंत पाटील, काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, सुभाष देसाई, अजित पोवार, सरलाताई पाटील, शिक्षक नेते दादा लाड, सुभाष जाधव, वसंत मुळीक, सीमा पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, व्ही. बी. पाटील, उत्तम पाटील, भगवानदादा पाटील, प्रा. नानासाहेब स्वामी, हसन देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य केवळ शिक्षण संस्थांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी अनेकांचे संसार उभे केले, सामान्य माणसाशी असलेली नाळ शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यांच्या कार्याची, आठवणींची आणि विचारांची नोंद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी स्मारकग्रंथ आणि दादांच्या कार्याचा शब्दकोश तयार करण्यात यावा. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा दस्तऐवज पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916