कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मंगळवार पेठ (मिरजकर तिकटी) येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता क्रांतिज्योत मिरवणुकीचे आयोजन केले आहे. अशी माहिती संस्थापक किसनराव कल्याणकर व अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती..
या क्रांतिज्योतिचे प्रज्वलन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते आदिल फरास तसेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषद गट नेते सतेज उर्फ बंटी डी. पाटील, व्ही.बी. पाटील, विजय जाधव, आर. के. पोवार, अॅड. महादेवराव आडगुळे, डॉ. भारत खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी ऑगस्ट क्रांतीदिनात शहिद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
१९५७ साली स्तंभाची उभारणी…
सन १९७८ पासून मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथील हतात्मा स्तंभाच्या चौकामध्ये देशासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा थोर क्रांतकिारकांची आठवण रहावी, म्हणून ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला भव्य क्रांतिज्योत मिरवणूकीची सुरुवात किसनराव कल्याणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यावतीने केली. माजी नगराध्यक्ष केशवराव जगदाळे, एम. के. जाधव, दत्तोबा चव्हाण, सखाराम बापू खराडे, तात्यासाहेब पाटील यांनी १९५७ साली १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांची स्मृती म्हणून मिरजकर तिकटी येथील चौकात या स्तंभाची उभारणी केली.
क्रांतिज्योतीची
४८ वर्षांची परंपरा कायम…
गेली ४८ वर्ष क्रांतिज्योतीची ही परंपरा कायम राखली आहे. यंदा क्रांतिज्योतिचे ४९ वे वर्ष असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योत मिरवणूक मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-दैवज्ञ बोर्डिंग मार्गे परत हुतात्मास्तंभ येथे आणण्यात येणार आहे. क्रांतीज्योत येऊन वंदे मातरमने क्रांतिज्योतीची सांगता केली जाणार आहे. या क्रांतिज्योतीमध्ये शहरातील लोकप्रतिनिधींसह राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आणि विद्यार्थी, विविध तालीम, मंडळे, संस्थांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
क्रांतीज्योतीचे यंदाचे ४९ वे वर्ष..
यंदा क्रांतिज्योतीला ४८ वर्ष पूर्ण झाली आहेत. संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेच्या वाटचालीचा हा प्रवास स्मरणिकेच्या रुपाने लोकांपुढे ठेवण्याचाही संस्थेचा मानस आहे. यानिमित्ताने विविध क्रांतिकारकांची माहितीसह संस्थेच्या वाटचालीचा आढावा यंदाच्या वर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या या स्मरणिकेत असणार आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
देशासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा क्रांतिकारकांची आठवण भावी पिढीला होवून क्रांतिकारकांचा इतिहास याही पिढीला ज्ञात होण्यासाठी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ ते ७ वी तील विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांची पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. तसेच ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाच्या निमित्त छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रिडा संकूल येथे वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात येणार आहे.
आमदार फंडातून निधीची मागणी
नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मंगळवार पेठ येथील हुतात्मा स्तंभ हा शहराचे वैभव वाढवणारा आहे. या स्तंभाच्या सुशोभिकरणाच्या निधीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे संस्थेतर्फे आमदार फंडातून निधीची मागणी केली आहे. कोल्हापूर शहराचा नांवलौकीक वाढवणारा प्रमुख चौक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही.
सर्व रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर फलक
हुतात्मा स्तंभाच्या परिसरातील सर्व रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे फलक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील क्रांतीकारकांच्या नांवे असणाऱ्या चौकांमध्ये त्या चौकांचे फलक आकर्षक पद्धतीने उभारण्याचा मनोदय संस्थेचा आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचा मानस
या व्यतिरीक्त आगामी काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा हुतात्मा स्तंभाच्या परिसरामध्ये स्थापन करण्याचा मनोदय हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचा आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील आहेत. हतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दुधकट्टा येथे उभारण्याचा हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचा मानस आहे. त्याचबरोबर येत्या वर्षात कोल्हापूरचे क्रांतिसेनानी चिमासाहेब महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, यांच्यासह अनेक क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना जयंती व स्मृतीदिनाच्या निमित्ताने वर्षभर अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सदर उपक्रम हे संस्थेने नियोजनबद्धरित्या आयोजित केले आहे. तरी कोल्हापूरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभागा नोंदवावा, असे आवाहनही हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेने केले आहे. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष किशोर यादव, कार्याध्यक्ष केदार पायमल, खजानीस प्रशांत डकरे, सेक्रेटरी मुसाभाई शेख, ऑडीटर किरण भोसले, कर सल्लागार युवराज तेली तसेच कार्यकारिणी सदस्य सतिश पोवार, सुनिल हंकारे, दिपक म्हेत्तर, राजेश पार्टे, धनाजी घोरपडे, प्रशांत बरगे, रोहीत गाडीवडर, अविनाश पोवार, अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916