दिलबहारची उपांत्य फेरीत धडक 

- महापौर चषक फुटबॉल स्पर्धा : अखेरच्या मिनिटांपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात टायब्रेकरवर खंडोबावर ३-१ गोलने मात 

कॅप्शन -दिलबहार विरुध्द खंडोबा यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात चेंडूवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करताना प्रतिस्पर्धी संघांचे खेळाडू.

– लढवय्या खेळाडू – खंडोबाचा खेळाडू प्रभू पोवार 

– आजपासून उपांत्य सामन्यांना प्रारंभ : दु ४ वाजता होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात पीटीएम भिडणार तुल्यबळ वेताळमाळशी.

कोल्हापूर :  (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

अखेरच्या मिनिटांपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दिलबहारने खंडोबावर टायब्रेकरवर ३-१ गोलने मात करुन उपांत्य फेरीत धडक मारली. सामना पूर्णवेळ २-२ गोल बरोबरीत राहिला. यामुळे पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. सामन्यात लढवय्या खेळाडू खंडोबाचा प्रभू पोवार ठरला. दिलबहारचा गोलकिपर जयकुमार मेहता व खंडोबाचा गोलकिपर आयुष चौगलेने उत्कृष्ठ गोलकिपिंक करुन सामन्याची रंगत वाढविली. दिलबहारचा गोलकिपर जयकुमार मेहताने दोन पेनल्टी पंच करुन बाहेर काढल्या. तर एक पेनल्टी सूर मारुन तटवून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

छत्रपती शाहू स्टेडियम मैदानावर सुरु असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना बुधवारी दुपारी चार वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुध्द खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळविण्यात आला. तुल्यबळ संघातील सामना अपेक्षेप्रमाणे अखेरच्या मिनिटापर्यंत रंगतदार झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी सुरुवातीपासून वेगवान खेळाला सुरुवात करुन प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे प्रयत्न सुरु केले. दिलबहारचा खेळाडू थांगलेनच्या पासवर स्वयम साळोखेने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला मैदानी गोल करुन संघाला १-० गोलची आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला दिलबहारच्या प्रथम भोसलेच्या पासवर थांगलेनने मैदानी गोल करुन संघाला २-० गोलची आघाडी मिळवून दिली. खंडोबाने गोल आघाडी कमी करण्यासाठी दिलबहारवर प्रतिहल्ला चढविला. खंडोबाकडून विष्णू मणिकंदमने दिलेल्या पासवर रोहीत जाधवने मैदानी गोल करुन संघाची गोल आघाडी एका गोलने कमी केली. पूर्वार्धात दिलबहारने २-१ गोलची आघाडी घेतली.

उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी गोल आघाडी कमी करण्यासाठी विविध चाली रचत वेगवान खेळ करुन दिलबहारवर गोल करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रयत्नाला अल्पावधीतच यश मिळाले. खंडोबाकडून विनायक पाटीलने दिलेल्या पासवर संकेत मेढेने मैदानी गोल करुन संघाला २-२ गोलची बरोबरी मिळवून दिली. खंडोबाकडून कुणाल दळवी, प्रभू पोवार, पृथ्वीराज साळोखे, ऋतुराज संकपाळ यांनी तर दिलबहारकडून माणिक पाटील, फेबीन, सुमित घाटगे, सुशांत अतिग्रे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडविले. पूर्णवेळ सामना २-२ गोल बरोबरीत राहिल्याने पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. टायब्रेकरवर दिलबहारने खंडोबावर ३-१ गोलने मात करुन उपांत्यफेरीत धडक मारली.

चौकटी

– असे झाले टायब्रेकरवर गोल 

खंडोबा गोल दिलबहार गोल

विष्णू मणिकंदम ० फेबीन १

विनायक पाटील ० लामखेलीम ०

संकेत मेढे १ सुमित घाटगे १

प्रभू पोवार ० प्रथम भोसले १

एकुण १ एकुण ३

टायब्रेकरवर दिलबहारची खंडोबावर ३-१ गोलने मात.

 

– टायब्रेकरमध्ये उत्कृष्ठ गोलकिपिंग …

टायब्रेकरमध्ये दिलबहारचा गोलकिपर जयकुमार मेहताने उत्कृष्ठ गोलकिपिंग करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्याने खंडोबाच्या विष्णू मणिकंदम, विनायक पाटील यांनी मारलेल्या पेनल्टी पंच करुन बाहेर काढली तर प्रभू पोवारने मारलेली पेनल्टी सूर मारुन अडविली

– आजचा पहिला उपांत्य सामना .

दु ४ वाजता पहिल्या उपांत्य सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ भिडणार तुल्यबळ वेताळमाळ तालीम मंडळशी.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!