कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
‘हालचाल, शिकणे आणि शोधणे’ (मुव्ह, लर्न, डिस्कव्हर) या जागतिक ऑलिम्पिक सूत्रावर आधारित या सप्ताहात केवळ क्रीडाच नव्हे, तर आरोग्य आणि शांततेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला. दि. २३ ते ३० जून २०२६ या कालावधीत रंगलेल्या या सप्ताहाने कोल्हापूरच्या क्रीडानगरीत एक नवी ऊर्जा फुंकली. वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट व ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन तर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन सप्ताहाची’ शाहूपुरी व्यापार पेठ येथे सांगता झाली.

चिमुकल्यांनी साकारले कुंचल्यातून ऑलिम्पिकचे स्वप्न
सप्ताहाचे मुख्य आकर्षण चित्रकला स्पर्धा ठरली. ती शाहू बाल संस्कार केंद्रातील चौथी ते सातवीच्या मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल १०५ बालकांनी आपल्या संवेदनशील कुंचल्यातून ऑलिम्पिक मशाल, चक्र आणि विविध देशांचे ध्वज रेखाटून क्रीडा संस्कृतीशी नाते जोडले. चिंचवाड हायस्कूलमध्ये झालेल्या अभ्यासपूर्ण कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिकचा गौरवशाली इतिहास जाणून घेतला, तर वळीवडे गावात वुशू संघटना ग्रीन वळीवडे यांनी वृक्षारोपण करून खेळाडूंनी निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त केली. याच सोहळ्यात शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
शिबीरार्थींना देशासाठी खेळण्याचे आवाहन
स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक मानकरी, महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिबिराची सांगता झाली. शिबीरार्थींना देशासाठी खेळण्याचे आवाहन करण्यात आले. खाशाबांचा त्याग आणि लढा हाच आपला खरा आदर्श आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी कोल्हापूरच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा वळीवडे, उपाध्यक्ष सतीश वडणगेकर, सचिव सुभाष पासान्ना, मुख्य प्रशिक्षक अविनाश पाटील, रोहित काशीद, अमर मिरजे, शहानवाज नदाफ यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी परीश्रम घेतले.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754