कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघातर्फे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन : देशव्यापी धरणे आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

देशव्यापी धरणे आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करा, असे आवाहन भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर सोमवारी भारतीय मजदूर संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.


भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुधांशु रानडे आणि प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर यांनी राज्यातील सर्व संलग्न संघटना, पदाधिकारी आणि हजारो कामगारांना दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित देशव्यापी धरणे आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले होते.
या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ईएसआयसी (एडखउ) वेतन मर्यादा २१ हजार वरून ४२ हजार रुपये करण्यात यावी, पीएफ (एझऋ) अंतर्गत किमान पेन्शन १ हजार वरून ७ हजार ५०० प्रतिमहिना करण्यात यावी., ईपीएफ वेतन मर्यादा १५ हजार वरून ३० हजार करण्यात यावी., बोनस गणनेसाठी वेतन मर्यादा ७ हजार वरून १८ हजार करण्यात यावी., बोनस पात्रतेची वेतन मर्यादा २१ हजार वरून ४२ हजार करण्यात यावी आदींचा समावेश आहे. तसेच आशा स्वयं सेविका व अंगणवाडी सेविका ह्यांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा., देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण थांबवा. आदी मागण्यांचाही समावेश आहे.


या धरणे आंदोलनात भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळेजी, रवींद्र एडके, प्रवीण जाधव, एस. एं. पाटील, मुकुंद जोशी, शिवाजी मोर, संदीप पाटील, राजकुमार पाटील, राहुल भलबर, अमर लोहार, ज्योति तावरे, भगवान खाडे, रमेश थोरात आदी उपस्थित हाेते.
दरम्यान, भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्य समितीची बैठक दि. २६, २७ व २८ जुलै २०२६ रोजी सरला बिल विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. देशभरातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले हाेते. तसेच भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यसमितीने केंद्र सरकारला वरील सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. कामगारांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देशभरात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष एस. मल्लेशम होते. यावेळी अखिल भारतीय महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे, संघटन मंत्री बी. सुरेंद्रन, माजी अखिल भारतीय अध्यक्ष सी. के. साजी नारायणन, हिरण्मय पंड्या, महाराष्ट्राचे केंद्रीय सचिव अनिल ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, अखिल भारतीय असंघटित क्षेत्र प्रभारी जयंत देशपांडे, अण्णा धुमाळ बंदरे उद्योग प्रभारी, परिवहन महासंघाचे महामंत्री राजू भालेराव, प्रवासी कामगार प्रकोष्ठाचे प्रभारी श्रीपाद कुटासकर, बँक प्रभारी रामनाथ किणी, श्रीमती तृप्ती आळती, रेल्वे उद्योग मंगेश देशपांडे, बाळासाहेब भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे २० वरिष्ठ पदाधिकारी तसेच देशभरातील विविध उद्योग महासंघांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 5 4 5
Views Last 30 days : 77
Total views : 548918

You may also like

error: Content is protected !!