जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण

- शेत पानंद रस्ता कृती समितीचे कृष्णात जाधव यांची माहिती - तक्रारीची वाट न पाहता सर्व शेतपाणंद रस्ते तात्काळ खुले करण्याची प्रमुख मागणी

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

  तक्रारीची वाट न पाहता शासन निर्णयानुसार सर्व शेतपाणंद रस्ते तत्काळ खुले करण्यासह प्रलंबित नउ मागण्या तत्काळ मान्य करा, अन्यथा १३ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेत पानंद रस्ता कृती समितीचे कृष्णात जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी कृष्णात जाधव म्हणाले, राज्य शासनाने २५ मार्च २०२६ रोजी शेतपाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने कोणत्याही शेतकऱ्याच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून (सु मोटो) शासन निर्णयानुसार सर्व शेतपाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून वापरासाठी खुले करणे बंधनकारक आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेत पानंद रस्ता कृती समिती, कोल्हापूर जिल्हा यांनी केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकरी हिताचे निर्णय सातत्याने घेत असून त्याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. मात्र, या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हास्तरावर होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, अशी समितीची भूमिका आहे.
पुढे जाधव म्हणाले, समितीच्या म्हणण्यानुसार, शासन निर्णय लागू झाल्यापासून आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिक्रमण धारकांवर प्रभावी कारवाई झालेली दिसून आलेली नाही. तसेच शासन निर्णयानुसार शासकीय लाभांबाबत अपेक्षित कारवाई न करता अतिक्रमणधारकांना विविध शासकीय योजना व कर्जमाफीचा लाभ मिळत राहिला, तर दुसरीकडे रस्त्याअभावी शेतकऱ्यांना न्यायालयीन लढा देण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीस जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा समितीचा आरोप आहे. शासनाचा स्पष्ट आदेश असूनही प्रशासनाने स्वतःहून कारवाई करण्याऐवजी नवीन तक्रारींची वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा उद्देशच निष्फळ ठरत असून हजारो शेतकरी आजही आपल्या हक्काच्या शेतपाणंद रस्त्यापासून वंचित आहेत. याच निषेधार्थ शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून शासन निर्णयानुसार सर्व शेतपाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून वापरासाठी खुले करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेत पानंद रस्ता कृती समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने दि. १३ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे.


या पत्रकार परिषदेला उत्तम जाधव, कृष्णात पाटील, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, अमर पाटील आदींसह शेत पानंद रस्ता कृती समिती पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!