कोल्हापूरच्या खेळाडूंचे यश कौतुकास्पद

- जागतिक योगासन स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज निखिल तेली.)
भारतीय संस्कृतीत योगाला महत्त्व असून पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या खेळात कोल्हापूर अग्रगण्य राहील यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत सुविधा व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जागतिक योगासन स्पर्धेतील कोल्हापुरातील पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

तीन सुवर्ण व एक रौप्य पदकांची कमाई
ट्रांस स्टडिया स्टेडीयम, अहमदाबाद (गुजरात) येथे ४ ते ८ जून या काळात झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत सीनियर ब गटात सुपाईन या प्रकारात रोहित चव्हाण याने, ज्युनिअर गटात वृंदा भुतडा हिने फाँरवर्ड बेंडिंग तर निवेष पाटील याने सब ज्युनिअर गटात फाँरवर्ड बेंडिंग व पारंपरिक सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वृंदा भुतडा हिने सुवर्णपदक, निवेश पाटील याने दोन सुवर्णपदक तसेच रोहित चव्हाण याने रौप्यपदक संपादन केले.
स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभुषण कुमठेकर व सुहास पवळे यांचाही सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजी व सरदार तालीम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!